नाईल तीरी, मिस्र देशी
नाईल
तीरी, मिस्र देशी
प्रास्ताविक
भारतीय
संस्कृतीप्रमाणे मिस्रची संस्कृतीही फार जुनी आहे. त्यामुळे मिस्र देश म्हणजे
इजिप्त बघण्याची खूप उत्सुकता होती. विशेषतः मिस्र संस्कृती जिथे रुजली, वाढली
त्या नाईलबद्दल आकर्षण होतं. जेव्हा इजिप्तला जायचं ठरवलं तेव्हा उत्सुकतेपोटी
तिथलं खाणं-पिणं, हवापाणी ह्याबद्दल थोडी माहिती मिळवली. तिथल्या देवतांची नावं
आणि कथाही बरेचदा स्थळ-काळाप्रमाणे बदलट असल्यामुळे मिस्रच्या देवदेवतांच्या कथा
जरा गोंधळात टाकणं-या आहेत. तसंच इ.स.पू. ३०० ते इ.स. ७०० पर्यंतचा इतिहास राजकीय
सत्तांतरे, धार्मिक उलथा-पालथ, वास्तूंची तोडमोड, नासधूस ह्यांनी गजबजलेला आहे.
म्हणून परत आल्यानंतरही त्यांचा इतिहास, राजघराणी, देवता, सगळी वास्तुशिल्प
इत्यादींचा पुन्हा एकदा आढावा घेतला.
नाईलच्या
तीरावर
नाईल. जगातली सर्वात लांब म्हणजे ६६५० कि.मी. वाहत जाणारी नदी. ती आफ्रिकेतल्या एकूण अकरा देशातून वाहते. पण नाईल म्हटलं की तिचा संबंध सर्वात
आधी मिस्रच्या प्राचीन संस्कृतीशी जोडला जातो. मिस्रमध्ये नाईलच्या तीरावर इ.स.पू.
६००० मध्ये पहिल्या वसाहती झाल्या असाव्यात. ह्या प्रदेशाचा प्राचीन इतिहास इ.स.पू.
३१०० पासून उपलब्ध असल्याचं दिसतं.
मिस्रमध्ये
बघायला मिळतात ती अतिप्राचीन संस्कृती आणि कलेची साक्ष देणारी, अतिभव्य आणि अचंबित
करून टाकणारी अनेक स्थळं. पिऱ्यामिड्स्, वेगवेगळ्या प्रकारच्या दफनभूमी, राजांची
आणि देवांची देवळं. ही सर्व मिस्रच्या प्राचीन इतिहासाची साक्ष देतात. म्हणून
मिस्र चा इतिहास थोडक्यात बघणं आवश्यक ठरतं.
सुरवातीपासूनच
मिस्र देशाचे दोन भाग मानले गेले आहेत. एक नाईल नदीच्या असंख्य स्रोतांनी बनलेला दुआबाचा,
भूमध्यसमुद्राजवळचा सखोल प्रदेश आणि दुसरा त्याच्या दक्षिणेकडचा नाईलच्या तीरावर
वसलेला, सुदानच्या सीमेपर्यंत पसरलेला, नाईलच्या वरच्या अंगाचा प्रदेश. दुआबाचा
प्रदेश सुरु होतो त्याच्या दक्षिणेला प्राचीन मिस्रची ‘मेम्फिस’ नावाची राजधानी
होती. कैरो ह्या आताच्या राजधानीपासून जवळच. दक्षिणेकडच्या भागाची राजधानी होती ‘थेब्ज’,
आताच्या ‘लक्झोर’ ह्या गावाजवळ.
इ.स.पू.
३१०० ते साधारण इ.स.पू. ३५० पर्यंत अनेक राजघराण्यांनी मिस्रवर राज्य केलं. इ.स.पू.
सातव्या शतकापासून ह्या राजांची लीबियन, पर्शियन, असूरियन लोकांशी युध्द होत होती. इ.स.पू चौथ्या शतकात मॅसेडोनियाच्या अॅलेक्झांडरनं (इ.स.पू. ३५६ -३२३) मिस्रवर
चढाई केली, तो भूप्रदेश जिंकला आणि अॅलेक्झांड्रिया हे गाव वसवलं. इ.स.पू. चौथ्या शतकात
रोमन साम्राज्य प्रस्थापित झालं. इ.स.पू. पहिल्या शतकात ज्युलिअस सीझरनं (इ.स.पू.
१०० - ४४) मिस्रवर चढाई केली आणि क्लिओपात्रा सातवी हिच्याशी लग्न करून तिच्यावर
अॅलेक्झांड्रिया ह्या प्रांताची जबाबदारी सोपवली. तिचा इ.स.पू. ४० मध्ये मृत्यू
झाला. त्यानंतर टॉलेमी ह्या रोमन सेनाधिका-याने सत्ता हातात घेतली आणि त्याच्या वशाजांनी
ती पुढे चालवली. पुढे लवकरच मिस्र देशाचा पाडाव व्हायला सुरुवात झाली. इ.स. पाचव्या
शतकात रोमन साम्राज्याचा अंत झाला. तोपर्यंत रोमन साम्राज्यात आणि त्यामुळे मिस्रमधेही
ख्रिस्ती धर्माचा बराच प्रचार झाला होता. नंतर मिस्रमध्ये काही काळ पर्शियनांचं आधिपत्य
निर्माण झालं. सहाव्या शतकात इस्लामचा उदय झाला आणि मिस्रमध्ये इस्लामचा मोठ्या
प्रमाणावर प्रसार झाला. त्यामुळे आजही मुस्लिम बहुसंख्य असलेल्या मिस्र देशात ऑप्टिक
ख्रिश्चनांचं प्रमाण मोठं आहे. तसंच बरेच ज्यू लोकही पूर्वापार काळापासून इथे
स्थाईक आहेत.
इजिप्तचा
अर्वाचीन इतिहास
आठव्या
शतकापासून १९५२ पर्यंतचा मिस्रचा इतिहास काही उज्ज्वल म्हणावा असा नाही. पर्शियन,
तुर्की ऑट्टोमान
(१५१७-१८६७), फ्रेंच, ब्रिटीश (१८८२-१९५६) अशा विविध सत्तांच्या आधिपत्याखाली,
त्यांच्या साम्राज्याचा भाग बनून राहिलेला असा हा मिस्र देश होता. १९५२ साली
मुहम्मद नागीब आणि गमाल अब्देल नासर ह्या सेनाधिका-यांच्या नेतृत्वाखाली ‘फ्री
ऑफिसर्स मुव्हमेंट’च्या क्रांतीतून ब्रिटीश सत्ता उलथून पाडली गेली. त्याबरोबरच
इजिप्तमधली मोनार्की, सर्वंकष राजसत्ता संपली. त्यानंतरची दोन वर्षं मुहम्मद नागीब
प्रेसिडेंट होता. पण तो लोकप्रिय नव्हता आणि त्याला लवकरच सत्ता सोडावी लागली. पुढे
इजिप्तची प्रगती झाली ती नासर अध्यक्षपदी असतांना १९५४ ते १९७० ह्या सोळा वर्षांच्या काळात.
‘रेड सी’
आणि भूमध्य समुद्र जोडणारा सुएझ कालवा ब्रिटीश काळात १८६९ साली पूर्ण झाला. दळणवळण
आणि व्यापारासाठी अत्यंत महत्वाचा आणि सोयीचा. १९५२ नंतरही ह्यावरची सत्ता इंग्रज
सोडत नव्हते. नासरनी सुएझ कालव्याचं राष्ट्रीयीकरण केलं. त्यामुळेही तो लोकप्रिय झाला. त्याच्या काळात आस्वान ह्या
गावाजवळ नाईलवर मोठा डॅम बांधला गेला. ह्याला ‘नासर लेक’ म्हणतात. तिथे वीज
निर्मिती होऊ लागली आणि विजेच्या क्षेत्रात इजिप्त स्वावलंबी झाला.
पुढे
इस्राईल बरोबर झालेल्या युद्धात इजिप्तचा पराभव झाला (१९६७) आणि मुख्य म्हणजे सुएज
कालव्याचा ताबा इस्राईलकडे राहिला. इस्राईलला फ्रेंचांची आणि इंग्रजांची साथ होती.
पुढे ‘सादात’ अध्यक्ष असताना (१९७० – ८१) अमेरिकेच्या मध्यस्थीने करार होऊन १९७८
साली सुएज कालवा इजिप्तकडे आला. सादातनंतर १९८१ पासून २०११ मध्ये ‘अरब रायझिंग’पर्यंत
तीस वर्षं होस्नी मोबारक इजिप्तचे अध्यक्ष होते. आपल्याला सध्या इजिप्त हा देश
माहीत आहे तो २०११ नंतरच्या ‘अरब स्प्रिंग’मुळे आणि त्या वेळच्या राजकीय
अस्थिरतेमुळे. पण आत्ताचे अध्यक्ष ‘सिसी’ यांच्या काळात पाच-सहा वर्षांपासून बा-याच
प्रमाणात राजकीय स्थिरता निर्माण झाली आहे, असं सांगितलं जातं.
‘अरब
स्प्रिंग’मुळे आपल्याला माहीत झालेला ‘ताहरीर स्केअर’ बघण्याची उत्सुकता होती. तो
‘कैरो टॉवर’वरून बघता आला. ‘अरब स्प्रिंग’च्या वेळी तिथे लाखो लोक रात्रंदिवस धरण
धरून बसलेले होते, ते अजून आठवतं. ह्याखेरीज कैरोमधलं प्रचंड मोठं ‘नॅशनल म्युझियम’
बघितलं. कैरोमध्ये खूप रहदारी असलेल्या मोठ्या रस्त्यांवर भर वस्तीत जरा उंचवट्यावर
एक सिटॅडेल, म्हणजे मोठी तटबंदी आहे. आणि तिच्या आवारात एक फार सुंदर ऑटोमन
काळातली मोहम्मद आली मशीद आहे. तिथे काही वेळ घालवायला नक्कीच आवडलं असतं. पण हे
ठिकाण आम्ही वेळेअभावी लांबून रस्त्यावरूनच बघितलं.
प्राचीन
वास्तुशिल्पं आणि स्मारकं
गीझाचे पिरॅमिड्स् आणि जायंट स्फिंक्स (फोटो १५-२४)
इजिप्तचं
सर्वात मोठं आकर्षण म्हणजे कैरोच्या जवळचे ‘गीझाचे पिरॅमिड’. इ.स.पू. २५७५ – २१५० हा ओल्ड किंग्डम म्हणजे जुन्या राजवटीचा काळ मानला जातो. ह्या
काळात गीझाचे प्रसिध्द तीन पिरॅमिड बांधले गेले.
त्यातला ‘द ग्रेट
पिरॅमिड’ म्हणून ओळखला जाणारा पिरॅमिड इ.स.पू. २५६० – २५४० ह्या काळात खुफू किंवा किओप्स ह्या ‘फाराओ’साठी
म्हणजे राजासाठी बांधला गेला. त्याच्या जवळचे जरा लहान दोन पिरॅमिड हे त्याचा
मुलगा खाफ्रे किंवा खेफ्रेन आणि नातू मेनखोरे किंवा मेन्खीओस यांच्यासाठी बांधले
गेले. ह्या सबंध परिसरात इतरही लहान लहान पि-यामिड आढळतात. ‘द ग्रेट पिरॅमिड’समोर असलेला
एक प्रसिद्ध आणि प्रचंड मोठा ‘जायंट स्फिंक्स’ हाही पर्यटकांसाठी मोठं आकर्षण बनला
आहे.
हे
पिऱ्यामिड म्हणजे महाराजांच्या कबरी आणि स्मारकंच आहेत.
राजांच्या कबरींमध्ये त्यांना प्रिय आणि गरजेच्या अतिमौल्यवान गोष्टी ठेवण्याची
तिथे पद्धत होती. हे पिरॅमिड अतिभव्य आहेत. ‘द ग्रेट पिरॅमिड’ बांधला तेव्हा १४७ मीटरहून अधिक उंच होता असं
संशोधकांचं मत आहे. हे पिरॅमिड
म्हणजे प्रत्येकी वीस टनापेक्षा जास्त वजनाचे लाखो लाईमस्टोन आणि ग्रॅनाईटचे दगड
एकमेकांवर रचून केलेले अतिप्रचंड मनोरे आहेत. त्यांच्या मध्यभागी काबरस्थानाची
खोली असते आणि तिथे शवपेटी ठेवलेली असते अशी रचना आहे. त्या मनो-यांमध्ये आत जाता
आलं तरी तिथे ह्यातलं काहीच दिसतं नाही. फक्त एक छोटी रिकामी खोली पाहायला मिळते.
मानवाला
पूर्वापार, अगदी सुरवातीपासूनच मरण म्हणजे काय, मरणानंतरचं आयुष्य कसं असेल,
ह्याबद्दल गूढ आकर्षण वाटत आलेलं आहे. इजिप्तमध्ये मरणानंतर शवं कृत्रिम रित्या, काही
संस्कार करून, ममीज् म्हणून जतन केली जायची. ह्या प्रसिध्द ममीज् म्हणजे सर्व अतिश्रीमंत
राजेराजवाड्यांची मनोरथपूर्ती. त्यांनाच हे परवडत असे. त्यातून राजाला दैवत्व बहाल
केलेलं असे. तो मारणोत्तरही आपल्यावर नजर ठेऊन असेल आणि आपलं रक्षण करेल अशी
प्रजेचीच नव्हे, तर राजांची स्वतःचीही समजूत होती.
गीझाच्या
पठारावरचा ‘जायंट स्फिंक्स’ म्हणजे एक प्रचंड मोठा बसलेला सिंह आणि त्याला मानवी
डोकं असं त्याचं स्वरूप आहे. (७३ मीटर लांब, २० मी. उंच, १९ मी. रुंद). गीझाच्या
स्फिंक्सला फाराओ खाफ्रेचं (इ.स.पू. २५५८ ते २५३२), म्हणजे खुफूच्या मुलाचं डोकं जोडलेलं
आहे असं मानतात. ह्या ठिकाणच्या अतिभव्य पार्श्वभूमीवर एक साउंड आणि म्यूझिक शो
दाखवला जातो. तो फारच प्रेक्षणीय आहे.
‘व्हॅली
ऑफ किंग्ज्’
‘लक्झोर’मध्ये
असलेलं एक महत्वाचं प्रेक्षणीय स्थळ म्हणजे ‘व्हॅली ऑफ किंग्ज्’. लक्झोर कैरोच्या
बा-याच दक्षिणेला आहे आणि तिथे मध्यम उंचीचे पर्वत आहेत. ‘व्हॅली ऑफ किंग्ज्’मध्ये
एका खूप मोठ्या डोंगर उतारावर, दरीमध्ये इ.स.पू. १६०० ते ११०० ह्या जवळपास ५००
वर्षांच्या काळातल्या राजांच्या आणि सरदार-दरकदारांच्या ६४ मोठ्या कबरी आहेत. त्यात
‘राम्सेस’ ह्या प्रसिद्ध राजघराण्यातल्या राजांच्या आणि आपल्याला निदान नावानं परिचित
असलेल्या तुतनखामेनचीही कबर आहे.
दोनशे
इजिप्शियन पौंड म्हणजे साधरण आठशे रुपयांच्या तिकिटात ह्यातल्या एकूण तीन कबरी
बघायला मिळतात. तुतनखामेन (Tutankh Amon) च्या काबारीसाठी
मात्र तीनशे इजिप्शियन पौंड देऊन वेगळं तिकीट काढावं लागतं! तुतनखामेनची ‘ममी’,
म्हणजे जतन केलेलं शव, ब्रिटीश म्युझियममध्ये आहे असं म्हणतात. ह्या कबरीत ज्या अतिमौल्यवान
गोष्टी होत्या त्या मात्र एका वेगळ्या खोलीत कैरोमधल्या नॅशनल म्युझियममध्ये
बघायला मिळतात. बहुतेक प्रेक्षणीय ठिकाणी तीनशे इजिप्शियन पौंडाचं तिकीट काढूनच फोटो
काढता येतात. तुतनखामेनच्या कबरीत मात्र फोटो काढायला परवानगीच नव्हती.
इथल्या
काबारींमध्ये जाण्यासाठी लांब, उतरते, छोट्या पाय-या असलेले रस्ते आहेत. आम्ही
बघितलेल्या लेण्यांसारख्या तीन काबारींमध्ये दोन्ही बाजूंच्या भिंतीवर रंगवलेली
चित्रं काही प्रमाणात अजून दिसतात. ती फारच सुंदर आहेत. निळ्या रंगाची सुंदर नक्षीदार
छतं तिथे बघायला मिळतात. खूप ठिकाणी चित्रं दुरुस्त करण्याचं काम चाललं होतं.
त्यासाठी वापरलेले रंग मात्र मूळ रंगांपेक्षा खूपच भडक वाटले.
जवळच
असलेली ‘व्हॅली ऑफ क्विन्स’ मात्र आम्ही बघू शकलो नाही. तिथे जवळपास ७५ कबरी आहेत.
त्यात राम्सेस दुसराची (इ.स.पू.१२७९-१३) सौंदर्यवती पत्नी नेफरतारी हिची पण सुंदर
कबर आहे, असं समजलं.
अॅलेक्झॅन्ड्रिया
कॅटॅकोंब
अॅलेक्झॅन्ड्रियात
असलेले कॅटॅकोंब म्हणजे जमिनीत आत आत खणत जाऊन भुयाराच्या भुलभुलय्यात असलेले असंख्य
बोळ आणि त्यातले कोनाडे. शंभरहून जास्त पाय-या उतरत जाऊन ते बघता येतात. अशा
कोनाड्यांमध्ये सर्वसामान्य माणसांच्या शवपेट्या ठेवण्याची सोय होती, असं समजलं.
पोंपेई
पिलर
अॅलेक्झॅन्ड्रियात
आणखी एक प्राचीन उद्खननाची जागा दाखवतात, ती म्हणजे पोंपेई पिलर. इथे २०.४६ मीटर
उंचीचा आणि २.७१ मीटर परीघ असलेला एक मोठा पिलर, म्हणजे खांब दाखवतात. हा खांब गोल
नाही, तर निमुळता होत जाणारा एक ‘ओबेलिस्क’ आहे. पोम्पेई नावाचा रोमन सैन्यदलातला
एक वरिष्ठ अधिकारी होता. रोमन सम्राटाच्या विजयाचं प्रतीक म्हणून त्यानं हा स्तंभ तिस-या
शतकाच्या शेवटी उभारला. म्हणून तो ‘पोम्पेई’ ह्या नावानं प्रसिध्द आहे, असं
सांगितलं गेलं. ह्या जागी दोन स्फिंक्सही आहेत. पण गीझाच्या स्फिंक्स इतके भव्य
नाहीत.
अॅम्फी थिएटर
अॅलेक्झॅन्ड्रियात ‘अॅम्फी थिएटर’ म्हणून एक जागा
दाखवली जाते. त्याची रचना किंवा पुनर्निर्मिती अगदी अलिकडच्या काळात ग्रीक अॅम्फी
थिएटर डोळ्यासमोर ठेऊन झाली असावी, असं दिसतं.
अॅलेक्झॅन्ड्रिया
अॅलेक्झॅन्ड्रियाचं नाव आपण बरेचदा ऐकलेलं असतं
आणि एक महत्वाचं ऐतिहासिक स्थळ म्हणून आपल्याला ते बघण्याची उत्सुकता असते. इजिप्तच्या
अतिप्राचीन इतिहासाच्या मानानं अॅलेक्झॅन्ड्रिया हे इतकं जुनं ठिकाण नाही. ते
अॅलेक्झॅन्डर द ग्रेटनं इ.स.पू. चौथ्या शतकात वसवलेलं शहर आहे. पण तरीही तिथे
इतिहासाच्या फारच थोड्या खुणा बघायला मिळतात. त्यामुळे थोडी निराशा होते.
अॅलेक्झॅन्ड्रिया हे इजिप्तचं महाद्वारच होतं. इथूनच ग्रीक-रोमन चढाया झाल्या आणि
त्यातून ह्या दोन्ही संस्कृतींशी इजिप्तचा परिचय झाला. अॅलेक्झॅन्ड्रियात आणि
इजिप्तच्या एकूण इतिहासातच ग्रीक-रोमन सांस्कृतिक आणि पौराणिक संदर्भांची बरीच
सरमिसळ झालेली दिसते.
सेरेपियम
असं सांगितलं जातं, की अॅलेक्झॅन्ड्रियात ‘सेरेपियम’
नावाचा एक अतिभव्य असा देवळाचा कॉम्प्लेक्स किंवा परिसर बांधला गेला. पण पुढे
चौथ्या-पाचव्या शतकात ख्रिश्चन धर्माचा प्रचार झाल्यानंतर तो बहुतांशी उध्वस्त
करण्यात आला. पोम्पेई पिलर तसंच कॅटॅकोंब वगैरे अॅलेक्झॅन्ड्रियातल्या वास्तू ह्या
सेरेपियन कॉम्प्लेक्सचाच भाग होत्या. तसंच अॅलेक्झॅन्ड्रियाची जुनं प्रसिध्द मोठं
ग्रंथालयही सेरेपियाममध्ये होतं. ह्या कॉम्प्लेक्सची तोडफोड झाली तेव्हा ही
लायब्ररीही जाळण्यात आली. तिची अलिकडच्या काळात एका मॉडर्न इमारतीत पुन्हा स्थापना
करण्यात आली आहे. ह्या इमारतीबद्दल आणि लायब्ररीबद्दल इजिप्शियन लोकांना फार
अभिमान आहे.
टॉलेमी
पहिला (इ.स.पू. ३६६ – २८२ ) ह्याने ‘सेरापिस’ ह्या देवतेची स्थापना करून ‘सेरेपियम
कॉम्प्लेक्स’ बांधला. ह्या देवतेचं अनेकविध महत्व आहे. ही अॅलेक्झॅन्ड्रियाची
रक्षणकर्ती देवता आहे आणि ओसिरीस आणि अॅपिस ह्या इजिप्तशियन देवतांचं हे एकत्रित
रूप आहे, असं मानलं जातं. अॅपिस म्हणजे बैल. ह्याचा उल्लेख जुन्या राजवटीपासून
म्हणजे इ.स.पू. ३००० पासून आढळतो. अॅपिस
हे ग्रीक नावं आहे. इजिप्शिअन नाव हेप, किंवा हापी अशा उच्चाराचं आहे. ग्रीक
पौराणिक डायोनिसस ह्याचे गुण, म्हणजे औदार्य, विपुलता वगैरे सेरेपिसमध्ये बघितले
जातात. काही कथांमध्ये अॅपिस हा ‘हाथोर’ ह्या इजिप्शियन गाय देवतेचा मुलगा मानला
गेला आहे. ही देवताही औदार्यासाठी प्रसिध्द आहे.
इजिप्शियन देवतांची मांदियाळी आणि भव्य मंदिरं
अॅपिस हा देवत्व लाभलेला बहुधा पहिला प्राणी
असावा. तो बलवान, पुरुषत्व असलेला, अमर्त्य असा प्राणी मनाला जातो. ह्या गुणांचं प्रतीक
म्हणून तो इजिप्तच्या राजांशी अत्यंत घट्ट निगडीत आहे. अॅपिस मरत नाही, तो ओसिरीस
ह्या देवतेला जाऊन मिळतो आणि पुन्हा प्रकट होतो, अशी प्राचीन इजिप्तमध्ये श्रद्धा
होती. बैल मेला की राजेरजवाड्यांच्या इतमामानं आणि सर्व पूजा-अर्चा करून त्याला
पुरलं जायचं किंवा त्याची ममी बनवली जायची! अॅपिसविषयी अनेक कथा सांगितल्या जातात.
प्ता (Ptah) ह्या विश्वनिर्मात्या देवाचं अॅपिस हे प्रतीक मानलं जातं.
इजिप्तच्या
वेगवेगळ्या भागात आणि काळात वेगवेगळ्या देवतांचं महत्व होतं, असं दिसतं. पण मुख्य
म्हणजे इजिप्शिअन देवतांच्या मांदियाळीत ओसिरीस, इसीस, आमून, आटूम , रा असे मोठे
देव असले तरी अॅपिसचं महत्व त्यांच्यामुळे कुठेही कमी होत नाही. ‘रा’ किंवा ‘आमून-रा’ हे मूळ दैवत मानलं जातं. सगळ्यात बलिष्ठ देवता. ‘रा’ म्हणजे देव, विशेषतः सूर्यदेव. राजामध्ये त्याचा अंश असतो अशी श्रद्धा आहे. कधी कधी त्याचा आटूम म्हणूनही उल्लेख येतो. थेब्जच्या परिसरात, म्हणजे दक्षिणेकडच्या भागात आमून किंवा शू देवतेला नव्या राजवटीच्या काळापासून (इ.स.पू. १५२० ते १०७५) थेब्जची रक्षणकर्ती देवता मानलं गेलं. ही हवेची किंवा वा-याची देवता आहे. नून ही आमूनची भार्या आणि जल-देवता आहे. नू किंवा नून म्हणजे वादळी समुद्र आणि पाण्याची मूलदेवता, असं मानलं जातं.
हाथोर किंवा हाथूर ही गाय-देवता आहे. ती मातृत्वचं प्रतीक मानली जाते. हाथोर ही राजांची दैवी माता मानली जाते. अॅपीस आणि मात ही हथोर आणि ‘रा’ची मुलं असाही उल्लेख कुठेतरी आढळतो.
‘प्ता’ म्हणजे विश्वनिर्माता देव. म्हणजे आपल्या ब्रह्मदेवासारखा. मेम्फिस ह्या जुन्या राजधानीच्या, आत्ताच्या कैरोच्या परिसरात ‘प्ता’बरोबर त्याची भार्या ‘सेखमेत’ आणि मुलगी ‘नेफेरतूम’ ह्या त्रिकुट देवतांचं महत्व आहे.
ओसिरीस आणि आयसीस ह्या महत्वाच्या आणि नाईलशी संबंधित देवता आहेत. ओसिरीसचा भाऊ सेत ह्यानी ओसिरीसची हत्या करून त्याचे तुकडे करून नाईलमध्ये फेकले. ते गोळा करून त्याच्या पत्नीनं, आयसीसनं, त्याला पुन्हा जिवंत केलं आणि नंतर तिला त्याच्यापासून होरास हा मुलगा झाला. होरासला फाल्कन म्हणजे ससाणा-देव मानतात. ह्याचबरोबर नदीत पडलेले काही तुकडे पाण्यातल्या मगरींनी खाल्ले. म्हणून मगरीचं सुद्धा दैवरुप तयार झालं. ह्या मगरदेवतेचं नाव आहे सोबेक. सोबेक हा मुख्यत्वे करून प्रजननक्षमतेचं प्रतीक मानला जातो. ओसिरीस हा मृत्यूनंतरच्या जगाचा म्हणजे परलोकाचा देव. ह्या देवानी मृत्यू बघितला आहे. त्याला त्याची पत्नी आयसिस हिनी पुन्हा जिवंत केलं. म्हणून त्याला जीवन-मरण-जीवन ह्या साखळीतल्या रूपांतराचं, पुनरुज्जीवानाचं किंवा पुनरुत्थानाचं प्रतीक मानलं जातं. आयसिस ही सौंदर्य आणि जादूची शक्ती असलेली देवता मानली जाते.
देवळं
कोम ओम्बू
‘आस्वान’ला एक प्रचंड लेक आहे आणि हे एक जुनं
व्यापारासाठी प्रसिद्ध गाव आहे. आम्ही ‘आस्वान’पासून तीन दिवसाची नाईल-क्रूज घेतली
होती. आस्वानपासून साधारण ५० की.मी. वर असलेल्या कोम ओम्बूला आम्ही संध्याकाळी
पोचलो. या ठिकाणी एक जोडदेऊळ आहे. सोबेक आणि होरास ह्या देवतांचं. असं जोडदेऊळ
इतरत्र कुठे आढळत नाही. ह्या देवळाला शेजारी शेजारी दोन दरवाजे आहेत. एक सोबेकच्या
देवळाचा आणि दुसरा होरासच्या देवळाचा. ह्याचा काळ म्हणजे ग्रीको-रोमन राज्याचा काळ
(इ.स.पू. ३३२ ते इ.स. ३९५ ) आहे.
ह्या देवळाचा परिसरही प्रचंड मोठा आहे. ओसिरीस आणि आयसीसची ही दोन मुलं.
सोबेक आणि
होरास यांच्या विषयीही खूप आख्याइका आहेत. उदाहरणार्थ, काही कथांमध्ये हे दोघं भाऊ
आहेत किंवा दुस-या कथेमध्ये ही एकाच देवतेची दोन रूपं आहेत. होरासची चित्रं खूप
ठिकाणी बघायला मिळतात. त्याची सोन्या-चांदीची गळ्यात घालण्यासाठी लॉकेट्सही
मिळतात. अनुबिस हा जॅकल म्हणजे कोल्हा. त्याचे ऐटबाज पुतळे किंवा चित्र बघायला खूप ठिकाणी बघायला मिळतात. हा अगदी इ.स.पू. ३१०० म्हणजे पहिल्या राजघराण्यापासून काबारींचा रक्षणकर्ता मानला गेला आहे.
एड्फूचं देऊळ
ह्यानंतर दुस-या दिवशी पाहटे बघितलं ते एड्फू
ह्या ठिकाणचं देऊळ. हेही होरासचं मंदिर आहे. त्याच्या जन्माच्या गोष्टी इथे भिंतीवर
कोरलेल्या आहेत. हे मंदिर टॉलेमी तिसरा ह्याच्या काळात म्हणजे इ.स.पू. २३७ च्या
सुमारास बांधलं गेलं.
अबू
सिम्बेल
इजिप्त
मधली ही प्राचीन देवळं जशी देवतांची तशी राजा-राण्यांचीही आहेत! अबू सिम्बेल इथे
राजाचं एक मोठं आणि राणीचं एक लहान देऊळ आहे. ही दोन्ही मंदिरं खूप प्रसिध्द आहेत.
केवळ ही मंदिरं बघण्यासाठी लोक अबू सिम्बेलला जातात. आम्हीही आस्वानला जाण्याआधी अबू
सिम्बेलला गेलो. तिथे जाण्यासाठी सोयीची विमानसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही
मंदिरे बांधली तो साधारण इ.स.पू. १५२० ते १०७५ मधला म्हणजे नव्या राजवटीचा काळ
मानला जतो. ह्या काळात राम्सेस पहिला, राम्सेस दुसरा आणि राम्सेस तिसरा असे राजे
होऊन गेले. प्राचीन मिस्रचा परिचय करून घेताना ह्या राजांचा
वारंवार उल्लेख येतो. त्यातल्या राम्सेस दुसरा ह्या राजाने सगळ्यात जास्त
म्हणजे ६७ वर्षं राज्य केलं.
अबू सिम्बेलचं देऊळ त्याच्याच काळात बांधलं गेलं. ह्या देवळाच्या
बाहेर दगडात खोदलेल्या अतिभव्य चार मूर्ती दिसतात. रा-होराख्ती (रा आणि होरास
एकत्र), आमून-रा आणि प्ता अशा तीन देवांबरोबरच दैवत्व प्राप्त झालेल्या दुस-या
राम्सेस राजाचीहि मूर्ती इथे आहे. इथेही आतून फोटो काढायला परवानगी नाही. आतमध्ये
भिंतीत सुंदर कोरीव काम करून तयार केलेली रेखाचित्रं दिसतात. त्यामध्ये अनेक
प्रसंग, माणसं, प्रणिदेवाता वगैरे आहेत. ह्या देवळात आणि इतरत्रही
असं दिसतं की देवाचा अंश मानला गेलेला असा स्वतः राजा आणि पारंपरिक देव हे
एकमेकांबरोबर एकत्र चित्रित केलेले आहेत. राजा आणि देव एकमेकांसमोर उभे आहेत अशी
अनेक कोरीव चित्रं आहेत. ह्या चित्रांमध्ये राजा देवाला नेवेद्य देतांना किंवा
काहीतरी अर्पण करतांना दिसतो.
प्राचीन मिस्र मधली भिंतीवर कोरलेली सर्व रेखाचित्र सपाट, म्हणजे त्रिमिती
नसलेली आहेत.
ह्या परिसरात शेजारीच ‘लहान देऊळ’ आहे. ते आहे दुस-या राम्सेसच्या आवडत्या
राणीचं, म्हणजे सुंदर नेफेरतारीचं. ही दोन्ही देवळं आस्वानला ‘लो डॅम’ बांधल्यावर पाण्यात
गेली होती. युनेस्कोच्या भल्या मोठ्या प्रकल्पाद्वारे पाण्यातून उचलून अबू सिम्बेल
इथे त्यांची पुन्हा जोडणी आणि उभारणी करण्यात आली. ही देवळं इतकी भव्य आहेत, की ती
१९६४ ते ६८ ह्या काळात एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेली असतील, ह्यावर प्रथम
विश्वासच बसत नाही.
आयसिस
बेट
आयसिस
देवतेचं मंदिर आस्वानच्या परिसरात आहे. ते इ.स.पू. ६९० च्या सुमारास फिले (Philae) बेटावर बांधण्यात आलं. देवळाच्या मध्यभागी असलेला माम्मिसी चौक म्हणजे
आयसिसचा मुलगा होरास ह्याच्या जन्माची जागा म्हणून दाखवतात. इथेही भिंतीवर आणि
खांबांवर सुंदर कोरीवकाम केलेलं आढळतं. आस्वानला नवीन मोठा डॅम बांधल्यानंतर ‘लो
डॅम’मध्ये असलेले हे देऊळ पाण्याखाली जायला लागलं. म्हणून युनेस्को प्रकल्पाद्वारे
तो सगळा परिसर, संपूर्ण कॉम्प्लेक्स हलवून आजिल्किया ह्या बेटावर त्याची पुन्हा स्थापना
केली. आयसिसचं देऊळ आणि अबू सिम्बेलचं देऊळ ही अशी
स्थलांतर करून वसवलेली देवळं आहेत.
राणीचं देऊळ
आमची आस्वानला सुरु झालेली क्रूज लक्झोरला संपली. लाक्झोरजवळ
बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. अबू सिम्बेलला जसं राजाचं देऊळ आहे तसं लक्झोरला
एक राणीचं देऊळ आहे. हाथशेप्सत (Hatshepsut) ह्या एकमेव राणीचा उल्लेख
मिस्रच्या प्राचीन इतिहासात येतो. ह्या राणीनं पुरुषाच्या पोशाखात आणि परुषाप्रमाणे
दाढी लाऊन राज्य केलं. ती राम्सेस राज्यांच्या आधी म्हणजे नव्या राजवटीच्या
सुरवातीला, इ.स.पू. १५२० सुमारास काही वर्ष सत्तेवर होती.
लक्झोर
टेम्पल
‘लक्झोर
टेम्पल’ हे प्राचीन देऊळ नाईल नदीच्या पूर्व किना-यावर वसलेलं आहे. इ.स.पू. १४००
च्या सुमारास ते पूर्वीच्या थेब्ज आणि आताच्या लक्झोर ह्या शहरात बांधलं गेलं. हा
परिसर फार मोठा आहे. इथे कोणत्याही एका देवतेचं देऊळ नाही, तर राजाचा राज्याभिषेक
आणि राजाचं नवजीवन ह्यासाठी ही जागा प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या काळात आणि राजवटीत
ह्या परिसरात पुढे बांधकामं झाली. आज हे स्थळ वार्षिक कविसम्मेलनासाठीही प्रसिद्ध
आहे.
कार्नाक
देऊळ
जुन्या
थेब्ज गावाचं म्हणजे आताच्या लक्झोरचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे ‘कार्नाक देऊळ’. कार्नाक
देऊळ म्हणजे एक तटबंदी असलेला मोठा परिसर आहे. अरेबिक ‘खुर्नाक’ म्हणजे तटबंदी
असलेलं गाव. सेनुसरेत राजघराण्याच्या काळात इ.स.पू. १९७५ सुमारास बांधकामाची
सुरवात झाली आणि टोलेमी राजघराण्याच्या काळापर्यंत (इ.स.पू. ३६६ –
२८२ ) नवीन विविध प्रकारची देवळं आणि इमारती बांधल्या गेल्या.
कार्नाकच्या
देवळाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची भव्यता. तिथे ५ हजार स्केअर मीटरचा एक हॉल आहे आणि
तिथे १६ ओळीत मिळून १३४ भव्य खांब आहेत. त्यातल्या काही खांबांची उंची १० मीटर तर
काहींची २१ मीटर आहे. इथे अनेक देवळे, प्रार्थनामंडप आणि इतर इमारती आहेत. ह्या
परिसरातल्या बहुतेक इमारती आणि खांब मोडलेले आणि उध्वस्त झालेले आहेत. ही शिल्पे इ.स.पू.
१९७५-१६४० ह्या काळातली आहेत. थेब्जला तोपर्यंत इतकं महत्व प्राप्त झालेलं नव्हतं.
थेब्जमधली ह्या पूर्वीची देवळे लहान होती आणि ती पृथ्वीदेवी मूट आणि आमून-रा ह्या
देवतांची होती. मेंढा आणि गूज किंवा हंस ही आमून-राची प्रतीके आहेत. ह्या
परिसराच्या प्रवेशापाशी दुतर्फा मेंढ्यांच्या मूर्तींच्या लंब रांगा आहेत.
हॉट
बलून राईड
लक्झोर
जवळ नाईलच्या पश्चिम किना-यावर ‘हॉट बलून राईड’चं केंद्र आहे. तिथे पहाटे पोचावं
लागतं. आम्हाला आमच्या क्रूजच्या बोटीवरून पाच वाजता निघून आधी बस आणि नंतर मोटार
बोटीनं जावं लागलं. बोटीमध्ये मस्त गरम कॉफी आणि बिस्कीट खायला मिळाली. जरा
ताजंतवानं होऊन आम्ही सव्वा सहाच्या सुमारास केंद्रावर पोचलो.
हवेत
मस्त गारठा होता आणि सगळीकडे अजून अंधारच होता. आम्ही बलून मध्ये चढून तो
उडेपर्यंत जरा जरा झुंझूमुंझू दिसायला लागलं होतं. बलूनमधून वर जाऊन सूर्योदय
बघायला फारच मजा आली. हजार-दीड हजार मीटर उंचीवरून बलून उडत होता. आम्ही नाईल नदी
ओलांडून पलिकडे पूर्वेच्या बाजूला गेलो. तिथून कार्नाक टेम्पलचा कॉम्प्लेक्स ओळखता
येत होता. अनेक सुंदर हडकुळे आणि उंच मनोरे दिसत होते. ह्या प्रकारचे मनोरे ही
इजिप्तची खासियत असावी. असे मनोरे सर्व प्रवासात दिसत होते. आम्हाला बलून राईड खूप
महाग पडली कारण त्यात आमचा गाईड आणि इतरांची मध्यस्थी होती. पण मजा आली.
इजिप्तची
वैशिष्ट्यं
(इजिप्तचं
वैशिष्ट्यं असलेल्या गोष्टी म्हणजे अलाबस्तर दगडाच्या वस्तू, पापिरूसवर केलेली
चित्रकला, विविध स्थानिक परफ्यूम्स म्हणजे अत्तरं, सोन्याची पेंडंट, खजूर, खान
मार्केटमध्ये मिळणा-या विविध भेटवस्तू.)
अलाबस्तर
अलाबास्तर
स्टोन ची लहान-मोठी शिल्पे आणि पापिरूसवर काढलेली चित्रं अतिशय कमी किमतीत
रस्त्यांवरच्या बाजारात मिळतात. पण त्यांच्या रंगाची आणि एकूणच दर्जाची काहीच
खात्री नसते. अलाबस्तर स्टोनचे अनेक रंगातले पिरॅमिड, मूर्ती, फुलदाण्या, लहान-मोठे
कलश हे सर्वत्र दिसतात. सिरॅमिकच्या वस्तूही दिसतात.
पापिरूस
पापिरूस
पेंटिंग च्या मोठ्या दुकानात पापिरूस कसं बनवतात त्याचं प्रात्यक्षिक बघायला
मिळालं. पापिरूसच्या झुडपापासून, त्याची देठं अळूच्या देठासारखी सोलून, ती देठं पाण्यात
भिजत टाकून, मग हातोड्यानं ठोकून, त्याच्या लांब पट्ट्या तयार करतात. त्या चटई
सारख्या एकमेकात गोवल्या जातात. ह्या घट्ट चटया परत एकजीव होईपर्यंत ठोकल्या जातात.
असा पापिरूस लवकचिक आणि सपाट असतो. त्याचा कागदासारखा उपयोग करता येतो. त्यावर
चित्रं रेखाटली जातात. ह्या पापिरुसची छान गुंडाळी करता येते. आपल्याकडे बांबूवर
केलेली मध्यप्रदेश-ओडिशाची पेंटींग्जही गुंडाळी करून ठेवता येतात. त्याची आठवण
झाली.
निळी
कमळं आणि पापिरूसची फुलं बा-याच पेंटींग्जमध्ये, भिंतीवर कोरलेल्या चित्रात आणि देवळातल्या
भव्य दगडी खांबांच्या वरच्या टोकाशीही दिसतात. नीळं कमळ हे इजिप्तचं राष्ट्रीय फूल
आहे.
इजिप्तची
निळाई
ह्या
निळ्या रंगाची एक गम्मत आहे. इजिप्तमध्ये इतर रंगांबरोबरच निळ्या रंगाचे
‘अलाबस्तर’ दगड सापडतात. तसंच उद्खननामधे निळ्या रंगाची मातीची भांडीही सापडली
आहेत. अशी भांडी पर्शियात, म्हणजे आताच्या इराणमध्येही सापडली आहेत. पण
युरोपियनांना हा रंग माहीत नव्हता. त्यामुळे ह्या रंगाचं त्यांना फार अप्रूप होतं.
निळ्या रंगात आकाशी ‘अझ्यूर’ निळा आणि हिरवट निळा ‘टर्क्वॉइज’ असे दोन प्रकार
आहेत. अझ्यूर हे नाव पर्शियात हा दगड जिथे सापडतो त्या जागेवरून पडलं आहे, असं
म्हणतात. तर टर्क्वॉइज हे नाव टर्की म्हणजे तुर्कस्तानवरून आलं आहे, कारण
तुर्कस्तानद्वारे हा रंग युरोपियनांना परिचित झाला, असं म्हणतात.
प्रतीकात्मक
भेट वस्तू
सोन्याची
पेंडनट्स ही तिथली आणखी एक आकर्षक पण खूप महाग वस्तू. त्यात जास्त करून ‘खार्तुश’
आणि होरास ह्या देवाचं प्रतीक असलेला ‘फाल्कन आय’ म्हणजे ससाण्याचा डोळा ही
वैशिष्ट्यपूर्ण आहेत. खार्तुश म्हणजे लंबगोलाकृती चपटी चकती असते. तीवर एका किंवा
दोन्ही बाजूंवर अरेबिक अक्षरं कोरलेली असतात. त्यावर पाहिजे तर स्वतःचं नावही कोरून
घेता येतं. ही सोन्याची किंवा चांदीची असतात. त्याहून व्हाईट मेटलची अर्थात खूप
स्वस्त असतात.
तिथल्या
फुलांचे सुगंध असलेली अत्तरेही इजिप्तचं वैशिष्ट्य म्हणून प्रसिद्ध आहेत. तसंच
इजिप्शिअन कॉटन, सुती कापडाचाही नेहमी उल्लेख होतो. मात्र आम्ही पाहिलेल्या एका
ठिकाणी ही कापडं फारच महाग होती.
जाता जाता
इजिप्तमधला प्रवास
इजिप्तमध्ये आम्ही बसनी, शिडाच्या बोटींनी,
मोटार बोटींनी तसंच तीन डेकच्या क्रूज बोटींनी आणि विमानांनी प्रवास केला. कैरो ते
आलेक्झांड्रिया हा तीन-साडेतीन तासांचा प्रवास आम्ही बसनी केला. आलेक्झांड्रिया
गावातले रस्ते अतिशय लहान आणि सर्व प्रकारच्या वाहनांची गर्दी असलेले होते.
बाहेरचे रस्ते अतिशय चांगले होते. खूप रहदारीही नव्हती. तुरळक ठिकाणी कारखाने
दिसले. म्हटलं तर हा तसा वाळवंटी प्रदेश, पण थोडी शेती आणि पुष्कळ झाडं दिसली. झाडं पाम प्रकारातली होती. नंतर लक्षात
आलं की ती सगळी खजुराची झाडं होती. थोड्या थोड्या अंतरावर सुंदर मिनार असलेले सफेद
रंगाचे व्हिले दिसले. बहुतेक सर्व व्हिल्यांच्या चारही बाजूनी खजुराच्या झाडांच्या
रांगा होत्या.
वॉटर लॉक
क्रूजचा प्रवास तसा थोडा होता पण फार मजा आली. एका
सकाळी आणि एका दुपारी काही तास छान डेकवर बसून काढता आले. एस्ना गावात ‘वॉटर लॉक’
होतं. म्हणजे पाण्याच्या दोन वेगळ्या पातळ्यांना जोडणारा भाग. तिथून एका वेळी एकच
बोट जाऊ शकते. बोटीच्या दोन्ही बाजूंनी पाण्याला लॉक लाऊन, पण्याची पतळी कमी किंवा
जास्त करून, बोट पुढच्या पाण्याच्या पातळीवर आणली जाते आणि मग लॉक उघडून पुढच्या
दिशेनी प्रवास सुरु होतो. ह्या प्रकारात भरपूर वेळ जातो. आमची बोट किना-याला
रांगेत उभी राहून लॉक उघडण्याची वाट बघत होती. तेव्हा डेकवर उभं राहून किना-यावरच्या
गावाचं निरीक्षण करता आलं. टेम्पो, सायकली, बस, खटारे अशी विविध वाहनं दिसली.
त्यात लोंबकाळणारे लोक दिसले. उगीचच रस्त्याच्या कडेला टोळकं करून उभी राहिलेली
तरुण मुलं दिसली.
तरंगता बाजार
आम्ही वॉटर लॉक जवळ आल्यावर आमच्या तीन
डेकवाल्या मोठ्या बोटीच्या अगदी जवळ पुढच्या बाजूला पाच-सहा लहान लहान बोटी
दिसल्या. प्रत्येक बोटीत दोन किंवा तीनच माणसं होती. बघणा-यांना त्या बोटी आपल्या मोठ्या
बोटीखाली चेंगरल्या जातील अशी भीती वाटत होती. अगदी जवळून बघितल्यावर लक्षात आलं
की ते विक्रेते होते! खालून इजिप्शिअन डिझाईन असलेल्या चादरी उलगडून दाखवत होते.
प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून त्या नेम धरून तिस-या किंवा दुस-या डेकवर फेकेत होते.
लोकं पैसेही प्लास्टिकच्या पिशव्यातून खाली फेकत होते. ते पाण्यात पडले तर
विक्रेते काठीच्या किंवा जाळ्याच्या सहाय्यानं ते उचलून घेत होते. असा हा छोटासा तरंगता
बाजार होता! ते पाहून मनात आलं पोटासाठी माणूस काय काय करतो!
निसर्ग सौंदर्याचा आस्वाद
लक्झोरला जाताना आम्हाला दुपारी दोन-तीन तास
बोटीत जरा निवांत मिळाले. हवा छान होती. प्रचंड मोठ्या काचेच्या खिडकीशी बसून निसर्ग
सौंदर्याचा आस्वाद घेता आला. काही भागात किना-याच्या उंचवट्यावर पिवळट-पंढरी
वाळवंटी रंगाची वाळू दिसली. क्वचित एखादा पोक्त माणूस पांढ-या ‘जिलेबिया’मध्ये म्हणजे
त्यांच्या गाऊन सारख्या लांब झग्यात उकिडवा बसलेला दिसला. कुठे चार मुलं खेळतांना
दिसली. एखादं खेचर, दोन-चार मेंढ्या दिसल्या. नदीचं पत्र मोठं असल्यामुळे किनारा
बराच दूर होता. तरी ही दृश्य मात्र मनात ठसली.
मोठे हिरवे पट्टे
बोटीच्या आणि बसच्या प्रवासात कडेला बरेचदा मोठे
हिरवे पट्टे आणि शेती दिसली. नदी किनारी केळीची आणि खजुराच्या झाडांची लागवड
केलेली दिसली. पुढे लक्झोरच्या बाहेर बसमधून जातांना चक्क बरीच उसाची शेती दिसली!
तिथे उसापासूनच साखर केली जाते असं समजलं. बलूनमधून वरून पाहतांना असं लक्षात आलं
की नाईल नदीच्या दोन्ही बाजूंनी नदीला समांतर असे कालवे होते. त्यामुळे नदी आणि
कालव्यांच्या परिसरात सगळीकडे हिरवं दिसतं होतं आणि हा मोठा पट्टा सोडला तर
सागळीकडे दूरवर पसरलेलं वळवंट होतं! नाईलला लाईफ लाईन म्हणजे जीवनदाईनी का
म्हणतात, ते इथे लक्षात येतं.
विषम हवामान
हा वाळवंटी प्रदेश असल्यामुळे इथे विषम हवामान
असतं. आम्ही डिसेंबरच्या सुरवातीला तिकडे गेलो होतो. सर्वसाधारणपणे हवा छान होती.
पण केव्हा केव्हा मळभ येत होतं आणि दोनदा तीनदा पाऊसही पडला. एकदा मात्र आम्हाला
वाळवंटी हवेचा चांगलाच तडाखा बसला. कैरोजवळ गीझाचे पि-यामिड जरा उंचावट्यावरच्या पठारावर
आहेत. ह्या वाळवंटी पठारावर जरा वारा सुटला तर बारीक रेती उडायला लागते.
सोसाट्याचा वारा सुटला तर आंधी कशी येत असेल ह्याची कल्पना करता येते. दुपारी इथे
बा-यापैकी गरम होतं. पण आम्ही संध्याकाळी सातच्या सुमारास लाईट आणि साउंड
प्रोग्रॅम बघायला आलो तेव्हा मरणाची कडाक्याची थंडी होती. त्या पठारावरावर
उघड्यावरचा कार्यक्रम काकडतच बघावा लागला. स्वेटर वगैरे गरम कपडे अजिबात पुरात
नव्हते!
शे-दोनशे टांगे
आमची बोट रात्री एड्फूच्या किना-याला लागल्यावर
पाहटे उठून आम्ही एड्फूचं देऊळ बघायला गेलो. आमच्या आसपास आणखी दोन-चार बोटी
थांबल्या होत्या. सर्व पर्यटक टांग्यातून देवळाकडे चालले होते. तिथे पोचलो तेव्हा
शे-दोनशे टांगे तिथे उभे होते! तेव्हाही हवेत छान गारठा होता. पण स्वेटर पुरत
होता.
इजिप्तची रोटी
एड्फूचं देऊळ बोटीपासून तीन-चार की.मी. लांब होतं.
आम्हाला रस्त्यात बरीच बेकरीसारखी दुकानं दिसली. तिथे पाव-बिस्किटांचे ताजे प्रकार
विक्रीला ठेवले होते. आणि त्याचबरोबर रोटीही विकत होते. ह्या रोट्या फक्त
गव्हाच्या नसाव्यात असं वाटलं, पण त्या होल व्हीटच्याच होत्या, असं समजलं. ‘ऐश
बालादी’ ब्रेड आणि ‘महलाब ब्रेड’ हे तिथले नेहमीचे रोटीचे प्रकार आम्हाला खूपदा
खायला मिळाले. जरा जाड आणि मोठ्या पुरीच्या आकाराचे. पण हे ब्रेड भट्टीत भाजलेले
असतात. त्यामुळेच ते बहुधा घरी न करता विकतच आणत असावेत. आपल्याकडेही दिल्ली-पंजाब
भागात एखाद्या तंदूरमध्ये बाहेरून रोटी भाजून आणायची पद्धत आहे.
रोजचा आहार
इजिप्तमध्ये बरंच मास आणि मच्छी खात असावेत. पण
हे सगळ्यांना परवडतं असं नाही. अर्थात मुसलमान देश असल्यामुळे पोर्क म्हणजे
डुकाराचं मास इथे अजिबात खात नाहीत. ससे, पारवे, बदकं, कोंबडी ह्या प्रकारांबरोबर
बीफ आणि मटन मात्र खूप खातात. बटाटा, भोपळी मिर्ची, कोबी, कांदा, टमॅटो, फ्लॉवर,
फारस बी अशा अनेक भाज्या दिसल्या. काही प्रकारच्या डाळी आणि वेगवेगळ्या बीन्स
खायला मिळाल्या. चपट्या ‘फावा’ बीन्स, शिवाय आपल्या राजम्यासारख्या बीन्स, तसंच
छोलेही वापरात असलेले दिसले. खूपदा यांचा सलाड मध्ये उपयोग केलेला दिसला. वेगवेगळ्या
प्रकारची चीज खायला मिळाली. ‘बकलावा’ आणि ‘बबूसा’ ह्या खास इजिप्शिअन स्वीट डिशही
खायला मिळाल्या. त्यामध्ये खजूर, मध, बदाम आणि सुका मेवा वगैरेचा मुबलक प्रमाणात
वापर केलेला असतो.
बायकांना थोडी मोकळीक
बायकांना थोडी मोकळीक असलेली दिसली. कैरो
विमानतळावर माझा पासपोर्ट तपासणारी एक बाईच होती. काळ्या बुरख्यात, पण तोंड न
झाकलेली. सगळ्या नाहीत, तरी पुष्कळ मोठ्या बायका काळा बुरखा घालतात, पण त्यांचा
चेहरा झाकलेला नसतो. तरुण मुली वेगवेगळ्या पोशाखात दिसल्या, पण बहुतेक
मुली केस तरी झाकतात. दुकानात विक्रेत्या बायकाही होत्या. पण सर्वसाधारणपणे
रस्त्यात आणि बाजारात बायकांची संख्या खूपच कमी होती. बायका कुटुंबांमध्ये
ब-यापैकी दबलेल्या असाव्यात असं ह्युमन राईट वॉचच्या निरीक्षणांवरून दिसतं.
समारोप
अशी
प्राचीन संस्कृती असलेल्या इजिप्तची लोकसंख्या आज ९६.७५ मिलियन म्हणजे
महाराष्ट्रापेक्षा जरा कमीच आहे. क्षेत्रफळ साधारण १० लाख चौरारास किलो मीटर आहे
आणि तिथे दर चौरस किलोमिटरमध्ये फक्त ९७ लोक राहतात. दर डोई उत्पन्न ३२६१ अमेरिकी
डॉलर आहे. ८५% लोक मुसलमान आहेत. जवळपास १४ % लोक ख्रिश्चन आणि बाकी इतर धर्माचे
लोक आहेत.
इजिप्तमध्ये
आम्ही चार महत्वाची शहरं आणि त्यांच्या परिसरातल्या प्राचीन वास्तू बघितल्या. कैरो
म्हणजे जुनं मेम्फिस, आलेक्झांड्रिया, लुक्झोर म्हणजे जुनं थेब्ज ह्या तीन आजी आणि
माजी राजधान्या आणि आस्वान हे व्यापारी शहर. इ.स.पू. ३१०० ते ३०० हा मिस्रच्या
प्राचीन इतिहासाचा काळ. त्यातली अतिभव्य अशी स्थापत्यकलेची, कोरीव कामाची,
मूर्तींची आणि चित्रकलेची साक्ष देणारी अनेक स्थळं, कबरी, स्मारकं, देवळं बघितली. ही
स्थळं अनेक देव-देवता, प्राणी देवता, राजेरजवाडे ह्यांच्या इतिहासाशी, तसंच
पौराणिक आणि दंतकथांशी संबंधित आहेत.
मिस्र आणि भारत
आम्ही इजिप्तमध्ये जिथे जिथे गेलो तिथे तिथे,
म्हणजे रस्त्यावरच्या बाजारात असो की दुकानांमध्ये असो, ‘इंडिया इंडिया’ असं ओरडून
स्वागत केलं जायचं. कधी कधी त्या ऐवजी अमिताभ बच्चन, शाहरुख खान अशी नावं ओरडून
म्हटली जायची. काही विक्रेते थोडं फार हिंदी बोलत होते. त्याची मजा वाटली. एकूण
भारताबद्दल लोकांना प्रेम आहे हे जाणवलं.
मिस्र आणि
भारत ह्यांचे संबंध प्राचीन आणि अर्वाचीन काळातही मित्रत्वाचे होते आणि आहेत. काही
अभ्यासकांच्या मते इ.स.पू. ३००० पासून ह्या दोन देशांमध्ये व्यापारी संबंध होते.
अशोकाच्या काळापासून बुद्धाचे धर्म प्रचारक, तसंच भारताचे राजदूत आणि व्यापारी
इजिप्तमध्ये गेल्याचे उल्लेख आढळतात.
इजिप्त
आणि भारतीय संस्कृती
इजिप्त
आणि भारतीय संस्कृती फार प्राचीन आहेत. दोन्ही संस्कृतीत निसर्गातल्या अनेक
अनाकलनीय गोष्टींबद्दल भय, कुतूहल आणि आदर असलेला दिसतो. त्यातूनच वेगवेगळ्या
देवतांची स्थापना झालेली दिसते. पण इजिप्तमध्ये प्रामुख्याने देवतांचं स्वरूप मानवी
देह आणि प्राणी आणि पक्षांची डोकी असंच आहे. तसं भारतात नाही. नंदी , उंदीर ही
देवाची वाहनं आहेत. हनुमान सेवक आहे. गाईला दैवत्व प्राप्त झालं आहे. विष्णूचे
अवतार आहेत. पण नरसिंहासारखी रूपं क्वचित आढळतात. दोन्ही संस्कृतींमध्ये पंचमहाभूतांना
दैवत्व देऊन, त्यांची उपासना करून त्यांना संतुष्ट आणि स्वतःला धार्जिणे करून
घेण्याचा सातत्यान प्रयत्न चाललेला दिसतो. भारतीय तत्त्वज्ञानानुसार प्रत्येक गोष्टीत
देवाचा अंश बघितला जातो आणि म्हणून प्रत्येक गोष्ट पूजनीय ठरते. भारतीय परंपरेत त्यातूनच
असंख्य देव निर्माण झाले आहेत.
प्राचीन
ग्रीक, रोमन आणि इजिप्शिअन संस्कृती ह्या मुख्यत्वे करून भूमध्यसमुद्राच्या
किना-यावर वाढलेल्या आणि रुजलेल्या संस्कृती. त्यांच्यात इजिप्तमध्ये मोठ्याप्रमाणात
संकरही झाला. ह्या तिन्ही संस्कृतींनी अतिभव्य शिल्पांमधून आपल्या सामर्थ्याची आणि
हिरोग्लिफ’ ह्या एक प्रकारच्या चित्रलीपीच्या माध्यमातून इतिहासाची नोंद केली आहे.
‘खार्तुश’ म्हणून एक लंबगोल प्रत्येक राजाच्या शिल्पाजवळ कोरलेला आढळतो. त्यात
हिरोग्लिफमध्ये राजाचं नाव नोंदलेलं असतं, अशी माहिती आम्हाला तिथे मिळाली.
प्राचीन
भारतीय संस्कृतीत भव्य शिल्पांचा हव्यास दिसत नाही. इतिहासाची नोंद किंवा
कुठल्याही प्रकारचा लिखित दस्त-ऐवज फारसा दिसत नाही. फक्त मौखिक परंपरेतून धर्माचं
किंवा खरं म्हणजे जीवनाचं तत्वज्ञान हे वेद आणि पुराणातून पुढच्या पिढीपर्यंत
पोचवलं जात होतं. शिल्पकलेतून आणि चित्रकलेतून कहाण्या संगितल्या गेल्या त्या जास्त
करून बौद्ध परंपरेत. अशोकापासून पुढे बरेच शिलालेखही सापडतात.
जीवन
आणि मरण
मुळात
आपली परंपरा ‘जगन् मिथ्या’ असं मानणारी आहे. ऐहिक जीवनाला महत्व नाही, पारमार्थ
हाच खरा, असं शिकवलं गेलं. हे चांगलं की वाईट, फायद्याचं की तोट्याचं
हा इथे चर्चेचा विषय नाही. मारणानंतर काय? मरण म्हणजे काय? ह्याकडे
बघण्याचा दृष्टीकोन प्रत्येक संस्कृतीत वेगळा आहे. इजिप्तमधे मरणानंतर माणूस पुढे
जगात असतो असं मानतात. म्हणून त्याच्या मौल्यवान गोष्टी त्याच्या शावाबरोबर
पुरतात. आपल्याकडे पुनर्जन्माची संकल्पना आहे. तोच आत्मा नवीन आवरणात , आकारात,
शरीरात पुन्हा जन्म घेतो, असं भारतीय परंपरेत मानतात. आपली ही पुनर्जन्माची
संकल्पना जशी उत्कर्ष आणि उत्क्रांतीशी निगडीत आहे तशीच ती पाप-पुण्याशीही निगडीत
आहे. चांगली कृत्य केली असतील तर पुढचा जन्म जास्त प्रगत जीवाच्या रुपात मिळतो.
अशा उत्कर्षाच्या शिडीवर मनुष्य जन्म हा सर्वात वरच्या पायरीवर पोचवतो. म्हणून
सुकर्म करत रहा म्हणजे उत्कर्ष होत राहील आणि शेवटी आत्मा पुनर्जन्मातून मुक्त
होईल, अशी धारणा आहे. त्यामुळे मेलेल्या माणसाच्या शवात आपलं चित्त अडकलेलं नसतं
आणि ते जाळून टाकणं हे शास्त्रशुद्ध आणि व्यवहार्य आहे, हे तर आपण जाणतोच.
महाकाव्य
आणि तत्वज्ञान
इजिप्तच्या साहित्यात सिनुहे किंवा सानेहातची
गोष्ट सापडते, पण इजिप्तच्या
प्राचीन इतिहासात महाकाव्याचा उल्लेख आढळत नाही. मात्र इ.स.पू. १५०० च्या
सुमारापासून साहित्य निर्मिती झाली अशी नोंद आहे. इजिप्तच्या
‘प्ता’ सारखा आपल्याकडे विश्वनिर्माता ब्रह्मदेव आहे. आयसिसनी आपल्या नवा-याला
जिवंत केलं हे ऐकल्यावर सावित्रीची आठवण झाल्यावाचून राहत नाही. ओसिरीसचा भाऊ सेत
हा सत्ता आणि संपत्ती मिळवण्यासाठी ओसिरीसची हत्या करतो. महाभारत आणि रामायण ह्या
दोन्ही महाकाव्यात इतिहास सांगितला गेला आहे असं आपण मानतो. आपल्या
महाकाव्यांमध्ये राजांना देव मानलं जात नाही किंवा सर्व राजांमध्ये सूर्याचा अंश
आहे, असं मानण्याची प्रथा नाही. रामाचे भाऊ लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न रामाचा
आदर करतात. संधी असूनही त्याची सत्ता बळकावत नाहीत. असे आदर्श आपल्या महाकाव्यातून
घालून दिलेले दिसतात. महाभारतात राज्यासाठी युद्ध हाच विषय आहे. पण महाभारतातलं
युद्ध हे न्याय मिळवण्यासाठी झालं असं प्रतिपादन केलं जातं. ह्या महाकाव्यात आचार
धर्म, न्याय, नीति ह्या मूल्यांचं महत्व सांगितलं गेलं आहे. महाभारत म्हणजे
जीवनाचं तत्वज्ञान. युद्धाबरोबर शिकवण आणि तत्त्वज्ञान हे विषय इतर संस्कृतींमधल्या
महाकाव्यांमध्ये फारसं दिसत नाही. आपल्या महाकाव्यांमध्ये सुष्ट आणि दुष्ट
शक्तींचा संघर्ष दाखवला जातो. सुष्टाचा नेहमी विजय होतो. दैवी शक्ती नेहमी न्यायाची
आणि नैतिकतेची बाजू उचलून धरतात. सत्याचा विजय होतो असं आपण मानतो. आजही आपलं
घोषवाक्यच ‘सत्यमेव जयते’ हेच आहे.
Comments
Post a Comment