उगवत्या सूर्याचा देश
उगवत्या सूर्याचा
देश
जपान.
एक वेगळा देश. हटके. खूप उत्सुकता होती. आणि योग जुळून आला. जपानचं निसर्गसौंदर्य,
जपानी कला-संस्कृती आणि मुख्य म्हणजे
जपानी लोकांशी जवळून परिचय होण्याचा. आत्तापर्यंत अनेक लोकांकडून ऐकलं होतं,
की जपान पाहून सगळे जपानच्या प्रेमात पडतात. आमचे मित्र राहुल देव
यांनी हौसेनं आमच्यासाठी ‘सरप्राईझिंग जपान’ची टूर आखली.
इतर पर्यटकांप्रमाणे आम्हीही अनेक श्राईन्स आणि टेम्पल्स
बघितली. बुद्धाची मूर्त असलेल्या ठिकाणांना सहसा टेम्पल म्हणजे देऊळ म्हणतात, असं
कळलं. पण नंतर लक्षात आलं की हे इंग्रजी शब्द इतक्या काटेकोरपणे वापरले जात नाहीत.
खरं तर कित्येक प्रार्थना घरांमध्ये शिंतो आणि बौद्ध घटक आणि तत्त्वं दिसतात. शिंतो
धर्माच्या आणि इतर पंथांच्या श्राईन्समध्ये म्हणजे मोठ्या गाभा-यांमध्ये मूर्ती
नसतात, हाच महत्वाचं फरक आहे. काही ठिकाणी आम्हाला पठण आणि इतर धार्मिक समारंभही
बघायला मिळाले. आपल्या देवालयांप्रमाणे काही खूप श्रीमंत आणि काही गरीब श्राईन्स
होते. काही ठिकाणी ट्रस्टीमधल्या झगड्याबद्दलही ऐकायला मिळालं! प्रत्येक श्राईन किंवा
टेम्पल बघण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला ५०० पासून २००० येन इतकी प्रवेश फी भरावी
लागली. पुष्कळशा ज्यू टेम्पलमध्ये म्हणजे ‘सिनॅगॉग’मध्ये, तसंच काही चर्चमध्ये थोडी
प्रवेश फी भरावी लागते हे अनुभवलं होतं. म्हणून आश्चर्य वाटलं नाही; पण दोन हजार
येन हे जरा जास्तीच वाटले. हे प्रवेश फी प्रकरण भारतात मात्र अजून ऐकलेलं नाही! आपली देवालय इतर अनेक मार्गांनी
पैसे मिळवतात. असो.
विशेष उल्लेखनीय वाटले ते श्राईन्स म्हणजे तोकिओमधला
‘माईजी जिंगू’ श्राईन, क्योतोमधला ‘कियोमिझुदेरा’ आणि हिरोशिमाजवळच्या मियाजिमा
बेटावरचा ‘मियाजिमा’ श्राईन. खरं तर नारामधलं सगळ्यात मोठं आणि संपूर्ण लाकडी तोडाईजी
टेम्पलही फार प्रेक्षणीय आहे. तोकिओमधला माईजी जिंगू श्राईन फक्त १०० वर्षं जुना
आहे. पण तसं वाटत नाही. खूप सुधारणा घडवणा-या लोकप्रिय माईजी सम्राटाच्या
मृत्युनंतर (१९१२) त्याच्या स्मरणार्थ हा शिंतो श्राईन बांधला गेला. दुस-या
महायुद्धात त्याची पडझड झाली पण त्याची पुनर्बांधणी केली (१९५८). ह्याचं वैशिष्ट्य
म्हणजे तोकीओच्या भर वस्तीत ‘शिबुया’च्या परिसरात हा श्राईन १७० एकराच्या शांत
परिसरात वसलेला आहे. तिथे सम्राट आ णि सम्राटाच्या किमती वस्तूंचे संग्रहालयही आहे.
कियोमिझुदेरा – डेरा किंवा देरा म्हणजे टेम्पल –
हे ओतावा पर्वताच्या साधारण मध्यावर एका लाकडी मंचावर उभारलेलं आहे. कान्नोन
नावाच्या दयाळू आणि क्षमाशील देवतेचं हे मंदिर आहे. जपानी लोकांची ह्या देवतेवर
श्रद्धा आहे. हा परिसरही निसर्गसौन्दार्यानी, सुंदर फुलं आणि झाडांनी नटलेला आहे.
देवळाच्या पाऊलवाटा आणि पाय-या संपल्यावर डोंगर उतारावरच वस्ती आणि लहान-मोठी
दुकानं सुरु होतात. मुख्य रस्त्याला डावी-उजवीकडे लहान उतरते रस्ते फुटतात.
त्यावरची दुकानं आणि घरांची छपरं फारच सुंदर दिसतात.
कियोमिझुदेरा आणि मियाजिमा श्राईन ह्या
‘युनेस्को वर्ल्ड हेरिटेज’ची ठिकाणं आहेत. हिरोशिमा
प्रांतातल्या मियाजिमा बेटावरचा मियाजिमा शिंतो श्राईन हा समुद्र किनारी, पाण्यात
बांधलेला श्राईन आहे. त्याचं ‘तोरी’ द्वार हे फ्लोटिंग, तरंगतं द्वार म्हणून
प्रसिद्ध आहे. तो ५९३ मध्ये बांधला गेला असं सांगतात. ह्या बेटाचं खरं नाव
उत्सुकुशिमा आहे. पण त्याचं लोकप्रिय नाव मियाजिमा असंच आहे.
ह्याखेरीज क्योतोमधला पर्यटकांचा
आवडता श्राईन म्हणजे ‘फुशिमी इनारी’ श्राईन. इनारी पर्वतपायथ्याशी बसलेला, हजारो
शेंदरी ‘तोरी’ म्हणजे द्वारं असलेला, झाडांच्या आणि माणसांच्या गर्दीतला, खूप
सोविनियर शॉप्स असलेला, डोंगरातून अनेक पाऊलवाटा आणि अनेक छोटी देवस्थानं असलेला
असा श्राईन.
देवळांचा सुंदर नमुना म्हणजे क्योतो मधली
किंकाकुजी म्हणजे पाण्यानं वेढलेलं गोल्डन टेम्पल आणि गिन्काकुजी म्हणजे वाळूच्या
अप्रतिम रचना असलेलं सिल्वर टेम्पल. दोन्ही मंदिरात प्रवेश करता येत नाही. दोन्ही
परिसरात उत्कृष्ट रचना असलेल्या बागा आणि निसर्ग यांचा एकमेकांशी सौंदर्यपूर्ण मेळ
घातलेला आहे. पर्यटकांनी ह्या दोन्ही स्थळांना जरूर भेट द्यावी.
जपानच्या चार राजधन्यांपैकी तीन राजधान्या बघितल्या.
‘तोकिओ’ ही आजची राजधानी. तिथे पंतप्रधानांचं घर लांबून बघितलं. राजाचा राजवाडा
कुठे आहे हे दाखवलं गेलं, पण त्याचा एक कणही दिसू शकला नाही. ‘क्योतो’ ही दुसरी
राजधानी. हे शहर सुंदर आहे आणि तिथे बघण्यासारख्या पुष्कळ जागाही आहेत. पण राजकीय
ऐतिहासिक वस्तू बघायला मिळाली नाही. त्यानंतर ‘नारा’. नारामधे ‘नारा-पार्क’ ही
प्रेक्षणीय जागा. तिथे अनेक देवळे. पण राजकीय इतिहासाची साक्ष कुठे दिसली नाही.
नारा गावापासून २०-२५ किलो मीटरवर जुन्या राजवाड्याची फक्त दोन प्रवेश द्वारं
शिल्लक असल्याचं समजलं. चौथी, बुद्धाची प्रचंड मूर्ती असलेली राजधानी ‘कामाकुरा’ मात्र
हुकली. पण ‘निक्को’मध्ये एक ‘तामोझावा’ नावाचा ‘समर व्हिला’ (1899) बघायला मिळाला. लाकडी सरकती दारं, सुंदर नक्षीकाम, चित्रकला असलेले पडदे
आणि रम्य बाग.
हिरोशिमामध्ये ‘गेन्बाकू डोम’ हे दुस-या
महायुद्धात झालेल्या संहाराचं स्मारक बघितलं. दगडी आणि साधं. त्याच्या बाजूला तेवती
ज्योत आणि संग्रहालय आहे आणि लगतच्या मोठ्या ‘पीस पार्क’मध्ये एक ‘पीस बेल’ही आहे.
ठसठसत्या जखमेवर मलम. ह्या ‘पीस बेल’वर देवनागरीत एक संदेश आहे. त्याची भाषा
भ्रष्ट संस्कृत सारखी वाटते. आपल्या ओळखीचे बरेच शब्द आहेत, पण सगळं कळत नाही.
त्यात बुद्ध आणि शांततेचा उल्लेख आहे. त्यावर १९४५ – ८/६/१९६४ अशी तारीख आणि लालणी
मेहरोत्रा हे नावं लिहिलेलं आहे.
आमच्यासाठी विशेष आनंददायी ठरलं
निक्को हे गाव. आमच्याबरोबर फुजी साकी ताडाओ हा निक्कोचा रहिवासी होता. त्यानं
दिवसाची आखणी केली होती. त्याच्या मित्राच्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही बकव्हीट नूडल्सचा
आस्वाद घेतला. हे रेस्टॉरंट म्हणजे एक मोठी पडवी आणि माजघरं असलेली जागा होती.
चपला बूट पडवीत काढून माजघरात प्रवेश करावा लागला. पडवीच्या पलीकडे बोळात भारातीय
पद्धतीची टॉयलेटं आणि ओळीनं नळ होते.
माजघरात सगळीकडे घट्ट विणीच्या
सुंदर तीन बाय सहाच्या किंवा त्याहून मोठ्या चटया एकमेकींना खेटून अंथरल्या
होत्या. सगळीकडे साधारण फुट-साव्वाफुट उंचीची लांबट टेबलं मांडलेली होती. त्यावर प्रत्येकासाठी
चॉप स्टिक्स आणि तीन सि-यामिक बाऊलमध्ये सोयासॉस आणि दोन प्रकारच्या चटण्या
होत्या. आम्ही बसल्यावर मोठ्या पसरट बाऊलमध्ये गरम बकव्हीट नूडल्स दिल्या गेल्या.
त्यानंतर जपानी बियर आणि साके छोट्या ग्लासमध्ये चवीसाठी मिळाल्या.
संध्याकाळी आम्ही फुजी साकीसानच्या
आईच्या ‘याक्को सूशी’ रेस्टॉरंटमध्ये गेलो. त्यांची शहराच्या वेगवेगळ्या भागात चार
सूशी रेस्टॉरंट आहेत. आम्ही गेलो होतो ते सूशी रेस्टॉरंट अतिशय सुंदर होतं. लांबट
टेबलाशी आम्ही खुर्च्यांवर बसलो होतो. सुबक बाऊल्स, सुंदर रंगीत मांडणी. चिनी मातीच्या
लांबट प्लेटवर त-हत-हेच्या सुशी दिल्या गेल्या. त्याबरोबर सोयसॉसही होतं. शिवाय
एका मोठ्या सुबक बाऊलमध्ये सूप दिलं गेलं. तिथे प्रसन्न वातावरणात आमची संध्याकाळ छान
गेली.
खरं तर आम्ही जपानला पोचलो तेव्हा
सकुराच्या बहर ओसरायला सुरवात झाली होती. निक्को उत्तरेला असल्यामुळे तिथे साकुरा
बघायला मिळेल अशी अशा होती आणि तसंच झालं. रस्त्यानं जाताना आम्हाला दुतर्फा
साकु-याची झाडं दिसत होती. पांढ-या रंगापासून अगदी गडद गुलाबी आणि काहीश्या फिक्या
जांभळ्या रंगापर्यंत अनेक छटा दिसल्या. बहरलेला साकुरा आम्हाला नेत्रसुख आणि आनंद
देऊन गेला. आम्ही बसमध्ये असतांनाच काही वेळ बर्फ आणि छोट्या गारांसह पाऊस पडून
गेला. बर्फ छोट्या ठिसूळ थेंबासारखा पडत होता आणि त्यातच सकुराच्या पांढ-या-गुलाबी
तलम पाकळ्याही पडत होत्या. ते दृश्य फारच सुंदर आणि मनोहारी होतं. आम्ही बसमध्ये
असल्यामुळे आम्हाला त्याचा मनसोक्त आनंद घेता आला.
आम्ही फुजीपर्यंत जाऊ शकलो नाही, पण जिथून फुजी छान दिसू शकेल, अशा ठिकाणी,
म्हणजे ‘फुजिनोमिया’ ह्या लहान गावात गेलो. तिथे एक नव्यानं बांधलेलं “फुजी वर्ल्ड हेरीटेज सेंटर” आहे. त्याची रचना फारच आकर्षक
आणि कल्पक आहे. तिथे एक पंधरा मिनिटांची फिल्म बघितली. त्यात सर्व ऋतुंमधल्या फुजीचं
दर्शन घडलं. अनपेक्षितपणे हवाही छान होती. फुजीचं बर्फाच्छादित शिखर स्पष्ट दिसतं
होतं. सगळ्यांनी ह्या पार्श्वभूमीवर मनसोक्त फोटो काढले.
त्यानंतर आम्ही ‘हाकता तेम्पुरा’
मध्ये भजी-भात खायला गेलो. शाकाहारी लोकांसाठी भाज्यांची आणि मांसाहारी लोकांसाठी
माश्यांची भाजी. ही जपानची आणखी एक खासियत.
आमच्या ट्रिपचे शेवटचे दोन दिवस
अगदी खास होते. जपानी कला, पेन्टिंग, लोकनृत्य आणि समारंभपूर्वक खाण्या-पिण्याच्या
गोष्टींचा अनुभव घेतला. ‘खावाने’ नावाच्या छोट्या, डोंगरात वसलेल्या गावात
पोचल्यावर आम्ही सबंध दुपार एका जपानी कुटुंबात, त्यांच्या घरात, त्यांच्या
मित्र-मैत्रिणींबरोबर त्यांच्या बागेत घालवली.
ह्या कुटुंबाच्या केंद्रस्थानी
असलेली व्यक्ती म्हणजे सोहो आज्जी. वय वर्ष एक्क्याऐंशी पूर्ण. उत्साहाचा अविरत
स्रोत. दिलदार. बाकी सगळे तिच्यापुढे नतमस्तक. ही स्वतः उत्तम पेंटिंग करते आणि
आजही वेगवेगळ्या गावी आठवड्यातून पाच दिवस पेंटिंगचे वर्ग चालवते! कोळसा उगाळून
किंवा काळा रंग वापरून तिने केलेली अनेक उत्कृष्ट चित्रं बघितली. तिला आम्हाला
पेंटिंग शिकवायचं होतं. पण वेळेअभावी आम्ही प्रत्येकानं तिच्या स्टेन्सिल्सवरून
एकेक टीशर्टवर पेंटिंग केलं! ते टीशर्ट मग आम्हाला भेट मिळाले.
रात्री आम्ही एका ‘स्पा’च्या कॉटेजेसमध्ये
झोपलो. खावाने हे अतिशय रम्य हिल स्टेशन आहे. आम्ही राहत होतो त्याच्या सर्व
बाजूंनी डोंगर होते. आमच्या कॉटेजच्या आवारात हॉट स्प्रिंगचा लहान तलाव होता. खाजगीपणा
जपणारा, झाडांनी वेढलेला, प्रसन्न आणि छताला आभाळ असलेला! मनात येईल तेव्हा त्यात
डुंबण्याची सोय होती. एक छोटी आगगाडीही जवळून जात होती. स्पाच्या कडेला एक छोटी
नदी होती. सकाळी उठून तिच्या कडेनं फेरफटका मारणं फारच आनंददायी होतं. बाजूच्या सर्व
डोंगरांवर भरगच्च झाडी होती आणि उतारांवर केरळची आठवण करून देणारे चहाचे मळे होते.
पण ते केरळ पेक्षा वेगळ्या पद्धतीने कापलेले होते. काही मळ्यांमध्ये खांबावर छोटे
पंखे लावलेले होते. काही मळे तर रस्त्यापर्यंत येत होते. तशीच रस्त्याच्या कडेवर
प्रचंड मोठ्या मोसुंब्यांनी लगडलेली झाडं होती. पण तिथे कधीही कोणी फळांना किंवा
फुलांना हात लावतांना दिसलं नाही.
दुसरा दिवस हा आमच्या सफारीचा
शेवटचा दिवस होता आणि तो दिवस आमच्या सफरीचा उच्च बिंदू गाठणारा ठरला. कार्यक्रम
भरगच्च होता. सकाळी पावणे नऊला खावानेच्या ‘मेयरीण बाईन्ची’भेट ठरली होती. पंधरा-वीस
मिनिट बोलणी झाल्यावर आम्ही गेलो टी-सेरेमनीला. बैठ्या, उतरत्या छपराच्या इमारती
होत्या. पुढे मोठं अंगण. मागे छोटी बाग, त्यात रंगीबेरंगी मासे असलेलं तळं.
माजघरासारख्या मोठ्या, एकाबाजूला काचेच्या खिडक्या असलेल्या खोलीत, चौकोनी
पंगतीच्या आकारात छोटे सुबक ट्रे आमची वाट बघत होते. त्या मागे लाल पट्ट्यावर आम्ही
वज्रासनात बसलो आणि चहाचा आस्वाद कसा घ्यायचा त्याचे धडे घेऊ लागलो. चहाची चव
आवडली नसली तरी तो सौंदर्यपूर्ण समारंभ सगळ्यांनाच भावाला. ट्रे मध्ये ठेवलेल्या
चहाच्या रंगीत डब्यांवर तर सगळ्या बायका लट्टू होत्या.
ह्या समारंभानंतर एक ‘सरप्राईझिंग
आयटेम’ होता. आम्ही सार्वजण उत्सुकतेने एका भिंतीशी अर्धगोलात बसलो होतो - आणि
रंगीबेरंगी कपड्यात आणि मास्क घालून एका कलाकाराने प्रवेश केला. मुखवट्याने चावा
घेत (!) त्यानं प्रत्येकाला आशीर्वाद दिला! त्यानंतर त्याची सहकलाकारा आली आणि
त्या दोघांनी तीस-चाळीस मिनिटं एक गंमतशीर सौंदर्यपूर्ण लोकनृत्य केलं.
त्यानंतर आम्ही सोहो आज्जीच्या घरी गेलो.
तिचं घर डोंगर उतारावर आहे.एका लाकडी चौथा-यावर असलेल्या त्या घरात लाकडी पार्टिशन
असलेल्या दोन मोठ्या खोल्या होत्या. एका खोलीत स्वैपाकाचा ओटा. त्या खोलीपुढे कठडे
नसलेली मोठी लाकडी टेरेस. त्यापुढे थोडा उतार असलेली मोठी बाग. आतल्या खोलीत एका
भिंतीला मोठी लाकडी कपाटं. कपाटांना लागून कोप-यात एक छोटा लाकडी जिना. वरती ही खोली
जवळ जवळ निम्मी झाकली जाईल एवढा कठडा असलेला माळा. तिथे दोन माणसं आरामात झोपू
शकतात.
माळ्यावरून मोठा बांबू आणून आमच्या
समोरच बागेमध्ये उभा चिरून त्याची एक पन्हळ बनवली गेली. ती उतरती ठेऊन त्यात
ट्यूबनी वाहणारं पाणी सोडलं गेलं. बागेत
बसून ‘पाण्यातल्या राईस नूडल्स’ पकडून खाण्याचा कार्यक्रम झाला! पन्हळीच्या बाजूनं
आम्ही स्टुलावर बसलो होतो. हातात बाऊल. त्यात सोयासॉस, आलं, बारीक चिरलेली कांद्याची
पात. चॉप स्टिकनी वाहत्या पाण्यातल्या राईस नूडल्स पकडून बाऊलमध्ये बुडवून
खायच्या. फार छान लागतात. उन्हाळ्यात करायची मजा. त्याबरोबर शिवाय मोठं सॅलड आणि
खूप फळं पण ठेवली होती. शिवाय ‘साकुरा राईस’ चवही मिळाली!
सोहो आज्जीचा परिवार खूप मोठा आहे.
मुख्य म्हणजे तिचे विद्यार्थी आणि इतर तरुण कलाकारही तिच्या घरोब्याचे आहेत आणि
तिचा अतिशय आदर करतात. तिचा साधारण पन्नासेक वर्षांचा कोशो नावाचा मुलगा आमचे आगत्य
करण्यासाठी झटत होता. नोकरी सोडून तो आता आज्जीबरोबर राहून तिच्या क्लासेसची आणि
प्रदर्शनाची व्यवस्था बघतो. त्याच्या बायकोचं खावानेच्या पायथ्याशी असलेल्या
‘शिझुओका’ गावात ‘तेम्पुरा’ रेरेस्टॉरंट आहे. आम्ही तिथेच ‘तेम्पुरा’ भाजी-भात
खाल्ला. आज्जी नेहमी ‘शिझुओका’मधेच राहते. आज्जीचा ब्याण्णव बारशाचा नवरा आमच्या
बरोबर होता. त्यानं फळं आणि साकुरा भाताची व्यवस्था बघितली. कुशिमा ही आज्जीची
मैत्रीण तिथे होती. तिनेच आमची एका बुद्धिस्ट मठात राहायची सोय केली होती. ह्याखेरीज
दोन कलाकार जोडपी त्या दिवशी मदतीसाठी तिथे आली होती. त्यामुळेच आमची दुपार चविष्ट
पदार्थ खाण्यात आणि सगळ्यांच्या सहवासात मजेत गेली. सोहो आज्जी इंग्रजी बोलत नाही.
पण आम्ही दिसल्यापासून ती खुशाल जपानीमध्ये बोलत, हातवारे करत आमच्याशी अखंड संवाद
साधत होती! आम्हाला म्हणली, ‘हार्ट टू हार्ट बोलायला भाषा लागत नाही’! ती म्हणते,
मी मागच्या जन्मी भारतीय होते! भारताबद्दल तिला अतिशय प्रेम! तीन-चार वेळा भारतात
येऊन गेली आहे.
मग आज्जीकडून निघून आम्ही एका
मोठ्या ‘टी म्युझियम’ला भेट दिली. जगात कुठे कधीपासून चहाचं उत्पादन होतं, चहा कुठे
कसा प्यायला जातो, अशातऱ्हेची माहिती नकाशे, फोटो आणि फिल्ममधून मिळाली. ग्रीन टी
आणि ब्लॅक टी मध्ये फरक काय, जपानमध्ये परंपरागत रेस्टॉरंट कशी असतात, अशीही
माहिती मिळाली. ह्या सगळ्यावर ताण म्हणजे ह्या म्युझियमचा परिसर आणि तिथली बाग!
अतिशय सुंदर.
नेहमीच्या टुरिझमपेक्षा ब-याच
वेगळ्या गोष्टी आम्ही केल्या ते राहुल देव ह्यांच्यामुळे. त्यांना जपानी भाषा अवगत
होती आणि त्यांचा मोठा जपानी मित्रपरिवार होता. आम्ही जपान रेल पास घेऊन गेलो होतो
आणि त्यामुळे वेगवेगळ्या बुलेट आणि लोकल ट्रेन्सनी प्रवास केला. कोदामा, रॅबिट एक्स्प्रेस,
साकुरा एक्स्प्रेस, नारिता एक्स्प्रेस अशी छान छान नावं असलेल्या अनेक बुलेट
ट्रेन्सचा प्रवास घडला. बस, टॅक्सी, ट्रॅमनी सुद्धा प्रवास केला. अर्थात ट्रेनमुळे
आम्हाला जास्त चालायला लागलं. पण जास्त बघायलाही मिळालं आणि जपानी लोकांशी जास्त
संपर्क आला. त्यांच्या रोजच्या आयुष्याची चुणूक बघायला मिळाली.
तीन रात्री आम्ही एका बुद्धिस्ट
मठात, म्हणजे धर्माशाळेसारख्या ठिकाणी राहिलो. तिथे सर्व सोयी होत्या, चटया आणि गाद्या
होत्या, पण पलंग नव्हते. त्यामुळे काही जणांची खूपच अडचण झाली. पण मठात राहाण्याचा
एक वेगळा अनुभव मिळाला. जपानी पदार्थ
प्रत्येकाला आवडतीलच असे नसतात. शाकाहारी पदार्थ मिळणं कठीण असतं. जिथे भारतीय
किंवा इटालियन रेस्टॉरंट नव्हती, किंवा बसून खाण्या इतका वेळ नव्हता, तिथे जरा
गैरसोय झाली. पण आमची तशी कौटुंबिक सहल असल्यामुळे कमी खाणं, जमिनीवर झोपणं आणि
खूप चालणं हे तब्येतीसाठी चांगलंच, असं म्हणून सगळ्यांनी ते साजरं केलं!!!
पुणे ते पुणे असा हा ११ दिवसांचा प्रवास होता. आमचा
ग्रुप लहान, म्हणजे फक्त वीस जणांचा होता. तसंच चांगल्या हवेनी आम्हाला साथ दिली. एकदाही
छत्री उघडावी लागली नाही, हे एक महदाश्चर्यच! ह्यामुळे आमची टूर व्यावसायिक टूर्सपेक्षा नक्कीच हटके
झाली.
जपानचे अनेक विशेष इतक्या थोड्या दिवसातही जाणवले. मुख्य म्हणजे सौंदर्य, स्वच्छता आणि शिस्त. सगळ्या रचनांमध्ये सौंदर्य हेच जपानचं एक महत्वाचं
वैशिष्ट्य आहे. जपानमध्ये प्रत्येक घरात आणि प्रत्येक प्रेक्षणीय स्थळी
लहान-मोठ्या सुंदर बागा आणि ताजी फुलं असतात. जपानमध्ये सगळ्याच गोष्टी – अगदी
खाण्यापासून बोलणं, कपडे, सजवट इथपर्यंत सर्व - अतिशय मृदू, सौम्य, संयमित, काही
अंशी सपक वाटतील अशा, पण तरीही सौंदर्यपूर्ण आणि आवडतील अशा असतात. जपानची आणखी एक
खासियत म्हणजे विविध प्रकारच्या दर्जेदार कागदाच्या तशाच सि-यामिक वस्तूंची
निर्मिती. ह्या सगळ्यासाठी दोन उचित विशेषणं म्हणजे - सुंदर आणि सुबक. कुठलीही
सजावट किंवा रंग अंगावर येत नाहीत, भडक वाटत नाहीत. चकचकीत इमारती आणि भेडसावणारी
होर्डींग्ज फारशी कुठे दिसत नाहीत.
ते आपणहून शिस्त पाळतात. स्वच्छतेसाठी
हे लोक केवळ सरकारी यंत्रणांवर अवलंबून राहत नाहीत. रस्ते, स्टेशन, बागा अत्यंत
स्वच्छ असतात. कुठे कपटा किंवा कचरा दिसला, तर जपानी माणूस स्वतः ते लगेच उचलतो!
स्वच्छतेची खोल जाणीव आणि प्रत्येकचा सहभाग. त्यामुळेच इतकी सार्वत्रिक स्वच्छता
शक्य आहे!
जपानी लोक कष्टाळू आहेत, हे तर
सर्वज्ञात आहे. पण ते किती समर्पित वृत्तीचे आणि मनापासून काम करणारे आहेत, हे
आम्हाला प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. तीन जपानी लोक तीन-चार दिवस आमच्याबरोबरच
होते. ते प्रत्येक लहान-मोठ्या कामासाठी, गोष्टींसाठी अक्षरशः झटत होते. ते चालत
नव्हतेच; आमची सोय बघण्यासाठी सतत पळत होते! आम्हाला सगळ्यांनाच त्याचं आश्चर्य
आणि कौतुक वाटलं.
जपानमधली शिस्त आणि व्यवस्थापन
वाखाणण्यासारखं आहे. मोठी स्टेशन्स, खूप गर्दी, पर्यटक असं असूनही कुठेही आवाज,
गोंधळ, तणाताणी दिसली नाही. सगळं अतिशय सुरळीत, शांतपणे चाललेलं दिसलं.
स्टेशनबाहेर विक्रेते, टाक्सी-गाड्या, बसेस, भिकारी असा कोणताही गोंधळ नाही. इथे
आत मोठं स्टेशन आहे, असं सहज ओळखताही आलं नसतं! आगगाड्यांची वारंवारिता खूप आहे
आणि गाडीसाठी लोकं रांगेतच उभे राहतात आणि रांगेतच आत चढतात!
खरं तर जपानचं क्षेत्रफळ आणि लोकसंख्या (३७८
हजार स्क्वे.कि.मी.;१२.७ मिलियन). काहीशी महाराष्ट्राशी (३०७ हजार स्क्वे.कि.मी.;११.२
मिलियन) मिळती-जुळती. पण आम्हाला कुठेही बकाली दिसली नाही की गर्दी दिसली नाही. भिकारी
नाहीत की भटकणारी बेवारस कुत्री दिसली नाहीत.!!!
जपानमध्ये कुठेही प्लास्टिक पिशव्या वापरू नका,
अशी घोषवाक्यं किंवा ताकीद दिलेली बघितली नाही. आम्ही जिथे लहानमोठी सुविनियर
खरेदी केली तेव्हा आम्हाला प्लास्टिकच्या पिशव्याच मिळाल्या. एक तर तिथे कचरा
व्यवस्थित वेगळा केला जातो आणि दुसरं म्हणजे रीसायकलिंग आणि पाणी शुद्ध करण्याचं
तंत्रज्ञान तिथे फार निष्णातपणे वापरलं जातं. ह्या बेटांच्या बनलेल्या देशात
कुठेही पाण्याची टंचाई जाणवली नाही. सगळीकडे पिण्यायोग्य स्वच्छ पाणी मिळतं. सर्व
नद्या कॅनॉलसारख्या काठानी बांधलेल्या आहेत. बसनी नाराहून क्योतोला जाताना अनेक
ठिकाणी तलाव करून शेतीसाठी, भातशेतीसाठी पाणी साठवलेलं दिसलं.
जपान कधीही ब्रिटनच्या अधिपत्याखाली नसतांनाही
इथे रहदारी डावीकडून चालते, ह्याचं आश्चर्य वाटलं. तिथे ट्रॅफिक जाम होतात, पण
कोणी उजवीकडून पुढे जातायत, कोणी हॉर्न वाजवतायत असं घडतच नाही. जपानमध्ये आम्हाला
एकही ‘ओव्हर वेट’ माणूस दिसला नाही. सगळ्या बायका हडकुळ्या, सपाट पोटाच्या.
पुरुषही प्रमाणात, व्यवस्थित. पण आश्चर्य म्हणजे हे लोक आपल्यापेक्षा पटीत जास्त
खातात, असं ऐकलं! आम्हाला कित्येक देवळांमध्ये अनेक तरुणी, लहान मुली आणि पुरुषही
किमोनो घालून वावरतांना दिसले. अजून किमोनोचा इतका वापर आहे ह्याची कल्पना नव्हती.
असं ऐकलं की किमोनो खूप महाग असतात आणि एका दिवसापुरते ते भाड्यानं घेतले जातात.
स्टेशनमध्ये जातांना तिकीट दाखवावं किंवा
इलेक्ट्रोनिक मशीनमध्ये घालावं लागतं. पण ट्रेन मध्ये तिकीट चेकर तुम्हाला तिकीट
विचारात नाही. आपल्या डब्यात शिरतांना आणि तिथून जाताना चेकर आपल्याला वाकून
अभिवादन करतात. आपल्याला तिकिटात काही बदल किंवा माहिती हवी असली, तर आपण चेकरला
थांबवायचं अशी पद्धत आहे! एकूणच गुन्ह्याचं प्रमाण तिथे कमी असावं.
जपानमध्ये विश्वासार्हता हा आणखी एक गुण
प्रत्ययाला येतो. शेवटचे दोन दिवस आम्ही ट्रेन बदलत प्रवास केला. त्यामुळे आम्ही
मोठं समान आधीच नारिता विमानतळाला पाठवून दिलं. विमानतळावर आम्ही पावत्या दाखवल्या,
तेव्हा आमचं सगळं समान लगेच ओळीनं बाहेर ठेवण्यात आलं. बॅग्जमध्ये समानाची अदलाबदल
करण्यासाठी तिथेच स्वतंत्र जागा ठेवली होती! कुठेही खोळंबा नाही, गोंधळ नाही. दहा
मिनटात आम्ही समान आवरून ‘चेक इन’साठी जाऊ शकलो!
जपानची तंत्रज्ञानातली प्रगती तर सर्वश्रुत आहे.
रस्त्यांची जाळी आहेत. रस्ते आणि लोहमार्गही अनेक ठिकाणी एकमेकांच्या डोक्यावरून
जातात. तोकिओमध्ये एका इमारतीत दोन स्वतंत्र मजल्यांच्या जागी लोहमार्ग आहेत!
म्हणजे आगगाडी त्या इमारतीमधून जाते!! शिंकान्सेन म्हणून प्रसिद्ध असलेल्या बुलेट
ट्रेनची सुरवात १९६४ मध्ये झाली. आणि आज त्यांची वारंवारिता दर ५ ते १० मिनिटांनी
एक एवढी आहे! आधुनिक तंत्रज्ञानाची आणखी एक गोष्ट म्हणजे टॉयलेट्स. ट्रेनमध्ये काय
किंवा हॉटेलमध्ये काय, कमोड असतात आणि आजूबाजूला ‘टच’ करायची अनेक इलेक्ट्रोनिक बटणं
असतात. चित्र असतात, पण लिपी फक्त जपानी. आधी बटणं शोधायची आणि मग कोणत्या बटणाला
स्पर्श करायचा ते भीत भीत ठरवायचं, असं दर वेळी करावं लगे. न जाणो, केव्हातरी
भलतीकडूनच फवारे सुटायचे!
जपान आधुनिक आहे, तरी पारंपारिक आहे; गतिमान तरी
संथ आहे. त्यामुळे वरच्या सगळ्याशी काहीशी विसंगत गोष्ट म्हणजे
तिथे मिळणारी अतिशय संथ सेवा - विमानात, विमानतळावर असो की रेस्टॉरंटमध्ये. जपानी
लोक जितके तंत्रज्ञानात प्रगत, तितकेच पारंपारिकही आहेत. धार्मिक विधी, पूजाअर्चा,
किमोनो. देवळात जाताना चपला काढाव्या लागत नाहीत, पण हात धुवावे लागतात. एका कंबरे
एवढ्या उंच छोट्या विहिरीसारख्या जागी पाणी असतं. भोवताली चरासारखी पाणी वाहायला जागा.
त्याच्या काठावर उभं राहून बांबूच्या लंब दांड्याच्या डावानं पाणी घेऊन दोन्ही हात
धुवायचे. मग डावात परत पाणी घेऊन तो दांडा खाली करून उभा धरायचा. म्हणजे डावातलं
पाणी दांड्या वरून ओघळून दांडा साफ होतो. मग तो विहिरीच्या काठावर खली तोंड करून
ठेवायचा. म्हणजे पुढच्या माणसाला स्वच्छ डाव मिळतो!
दुसरी जाणवलेली गोष्ट म्हणजे जपानी
लोकं अतिशय नतमस्तक असतात आणि मार्दवपूर्ण वागतात. सतत वाकूनच नमस्कार करतात.
त्यामुळे केव्हा तरी उगीचच अशी शंका येते, की पाहुणे आणि वरिष्ठ यांच्या समोर असं
वागणारी माणसं आपल्या कनिष्ठांशी फार कठोरपणे तर वागत नसतील?
हा एक लहान बेटांचा देश असल्यामुळे
जागेची फार अडचण असते. घरं खूप लहान असतात. पण सार्वजनिक जागा, बागा, स्टेशन्स
प्रशस्त आणि सुंदर असतात. लोकं जास्त वेळ घराबाहेरच असतात. जपान तसा महाग देश आहे.
लोक खूप तास ‘ओव्हर टाईम’ काम करतात, असं ऐकलं.
असं ऐकलं आहे की “कायझेन” तत्त्वाचा
स्वीकार केलेले जपानी कामगार आणि अधिकारी त्याचं काम उत्तम व्हावं म्हणून सर्वस्व पणाला
लावतात. दर्जेदार काम झालं नाही तर त्यात त्यांना व्यक्तीशः स्वतःचा अपमान वाटतो.
कामाचा आणि दर्जाचा दबाव, ह्यामुळे नैराश्य येऊ शकतं. इतर प्रगत देशांप्रमाणेच
जपानमध्येही लग्न न करण्याचं आणि आत्महत्येचं प्रमाण वाढतंय. शुक्रवार संध्याकाळी माणसं,
विशेषतः पुरुष, संध्याकाळपासून मजा करतात. खूप पितात. ६ – ६.३० नंतर सर्व ट्रेन
स्टेशन्स आणि हॉटेल्स भरलेली असतात.
जपान. निप्पोन-कोकू किंवा निहोन-कोकू म्हणजे स्टेट
ऑफ जपान. संविधानात्मक राजसत्ता. पार्लमेंट द्वीदलीय. स्थापना ११ फेब्रुवारी ६६०,
बी.सि., आत्ताचं संविधान ३ मे १९४७ रोजी लागू झालं. ह्या सर्व ऐतिहासिक नोंदी
तारखांसकट! तसा हा एक लहानसा ६८५२ बेटांचा बनलेला देश! ५२% शिंतो, ३५% बौद्ध, २%
ख्रिश्चन, शिवाय अनेक शिंतो पंथ. शिंतो आणि बौद्ध महायान पंथाचं पालन करणारे खूप लोक.
राष्ट्रीय भाषा जपानी. ४ लिप्या - कांजी, हिराकाना, काताकाना, क्युजी ताई.
ह्या छोट्या आणि महत्वाकांक्षी, विजिगीषु देशाचं
आश्चर्य करावं तेवढं थोडं आहे! म्हणूनच जपान बघूनही जपान विषयीचं कुतूहल संपलं नाही,
उलट वाढलं!!
Comments
Post a Comment